टिकली पहिली
----------------------------------------------------------------------
पोपचा देश :
व्हॅटिकन सिटी
व्हॅटिकन सिटी हा जगाच्या पाठीवरचा
सर्वाधिक लहान देश. टिकली काय ठिपकाही मोठा वाटावा अशा आकाराचा. अमेरिकेच्या वा
रशियाच्या आकारमानापुढे शब्दशः सुईच्या अग्रावर मावेल इतक्या छोट्या आकाराचा.
अवघा अर्धा चौरस किलोमीटर इतक्याच क्षेत्रफळाचा. २०१९ सालच्या आकडेवारीनुसार
त्याची लोकसंख्या जेमतेम ८२५. त्यातही बहुतांश पुरुष.
स्त्रिया अगदी हाताच्या बोटांवर मोजण्याएवढ्या. ही लोकसंख्या मुंबई-पुण्यातल्या
एखाद्या निवासी संकुलामधील रहिवाशांच्या संख्येपेक्षाही कमी भरावी..
कोरोना विषाणूची लागण सुरू झाल्याचं पहिलं
चिन्ह व्हॅटिकनच्या प्रशासनाला दिसलं ते ५ मार्च २०२० ला. त्यानंतर लगेचच सार्वजनिक
संपर्कावर बंदी घालण्यात आली आणि पोप यांचं समक्ष दर्शन बंद झालं. जगभरच्या
ख्रिश्चन बांधवांना त्यांचं दर्शन होऊ लागलं ते ऑनलाईन पद्धतीनं. ८ मार्चपासून तर व्हॅटिकनमधली
संग्रहालयं पर्यटकांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आली. १० मार्चला इटलीत लॉकडाऊन झाला.
परंतु
इटलीत जेवढी मनुष्यहानी झाली तेवढी सुदैवानं व्हॅटिकन सिटीत झाली नाही, पुरेशी
काळजी घेतली गेली हे त्यामागचं मुख्य कारण. व्हॅटिकन सिटीचं अर्थकारण अवलंबून असतं
ते पर्यटकांवर. २०१९ सालात ८० लाख डॉलर्सची स्टॅम्प तिकीटं विकली गेली, पण २०२०
सालात तो खप ७५ टक्के घसरला. २०२१ मार्च अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात तर १०८
दशलक्ष डॉलर्सची महसुली तूट व्हॅटिकन सिटीच्या प्रशासनाला सोसावी लागली..
*****
व्हॅटिकन सिटी हे जगभरच्या रोमन
कॅथलिकांचं मुख्यालय. जगभरच्या ख्रिश्चन धर्मीयांवर अधिराज्य गाजवणारे पोप महाशय
या सिटीत राहतात. त्यामुळे ख्रिश्चन धर्मीयांमध्ये या देशाचं स्थान सर्वाधिक मोठं
आणि पावित्र्याचं. व्हॅटिकन सिटी हे पोपचं, म्हणजे या धर्मप्रमुखांचं अधिकृत
निवासस्थान. सध्याचे धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांची निवड २०१३ साली झाली. पोप निवडले
जातात ते जगभरातल्या बिशप मंडळींकडून. निवड प्रक्रिया तशी गुप्त असते, परंतु
सिस्टीन चॅपेलच्या चिमणीतून धूर बाहेर पडायला लागला की निवड प्रक्रिया पूर्ण
झाल्याचा संदेश सर्वदूर जातो, आणि जगाला ही सुवार्ता समजते..
येशू ख्रिस्ताचा प्रमुख शिष्य सेंट पीटर
यानं जिथे हौतात्म्य पत्करलं, त्या भूमीवर झाली आहे व्हॅटिकन सिटीची उभारणी. आज ती
जागा व्हॅटिकन सिटीच्या बरोबर केंद्रस्थानी आहे. या सेंट पीटरच्याच थडग्यावर रोमन
सम्राट कॉन्स्टन्टीन द ग्रेटनं बॅसिलिकाची निर्मिती केली. बॅसिलिका आणि कॅथेड्रल
हे दोन्ही चर्चचेच प्रकार, परंतु बॅसिलिकाला पोपकडून काही विशेष अधिकार मिळतात. इ.
स. १५०६ मध्ये बॅसिलिकाच्या जीर्णोद्धाराला प्रारंभ झाला, त्यातून सध्याचं जगातलं
सर्वात मोठं म्हणून गौरवलं जाणारं सेंट पीटर्स चर्च उभं राहिलं..
पोप जॉन पॉल दुसरे यांच्या मृत्युनंतर
एप्रिल २००५ मधे कार्डीनल योझेफ रात्झिंगर व्हॅटिकन सिटीचे प्रमुख बनले. गम्मत
म्हणजे व्हॅटिकन हे धर्मपीठ असतानाही तिथे निवडणुका होतात. पण या निवडणुका नियमित
वा ठराविक कालावधीने होणाऱ्या निवडणुका नाहीत. तिथे निवडणूक होते ती विद्यमान
पोपचं निधन झाल्यानंतर किंवा त्यानं पद सोडल्यानंतर. सध्याचे पोप फ्रान्सिस २८
फेब्रुवारी २०१३ ला निवडून आले, ते कार्डीनल योझेफ रात्झिंगर यांनी राजीनामा
दिल्यामुळे..
फ्रान्सिस हे पहिले जेझुईट पोप, पहिले गैर
युरोपीय पोप, पहिले दक्षिण गोलार्धातून निवडून गेलेले पोप. पोप यांच्या रक्षणासाठी
व्हॅटिकन स्विस गार्ड नावाची स्वतंत्र यंत्रणा आहे. रोममध्ये ही यंत्रणा सर्वप्रथम
अस्तित्वात आली ती २२ जानेवारी १५०६ रोजी. तिला २०२० च्या २२ जानेवारीला ५१४ वर्षे
पूर्ण झाली. या गार्ड्सनी आजवर ४४ पोपचं रक्षण केलं आहे. १५२७ साली पाचव्या
चार्ल्सनं रोमवर हल्ला केला तेव्हा या दलातले १८९ पैकी अवघे ४२ गार्ड्स जिवंत राहू
शकले होते. या गार्ड्सचा गणवेष डिझाईन केला तो मायकेल एंजेलोनं. दर दोन वर्षांनी
ठराविक संख्येत गार्ड निवृत्त होत असल्यानं दरवर्षीच भरती सुरु असते. भरती होऊ
इच्छिणारा उमेदवार स्विस कॅथलिक असावा, स्विस लष्कराचं प्राथमिक प्रशिक्षण त्यानं
घेतलेलं असावं, त्याची उंची किमान ५ फूट ८ इंच असावी अशा काही किमान अटी असतात..
*****
रोम ही इटलीची राजधानी. रोमच्या वायव्य
भागात टायबर नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर व्हॅटिकन नावाच्या टेकडीवर वसली आहे ही
व्हॅटिकन सिटी. ही नगरी वसली ११ फेब्रुवारी १९२९ रोजी, म्हणजे येत्या दशकातच या नगरीची
शताब्दी साजरी होईल. व्हॅटिकनला दोनच ऋतु, मे ते सप्टेंबर कोरडा उन्हाळा आणि
ऑक्टोबर ते मे हलक्या पावसाचे, हिवाळ्याचे. व्हॅटिकनचा बराचसा भाग बागा आणि
उद्याने यांनीच व्यापला आहे. या बागांची निर्मिती झाली ती पोप निकोलसनं आपलं
कायमचं निवासस्थान म्हणून व्हॅटिकनची निवड केली तेव्हापासून, म्हणजे १२७९
सालापासून..
व्हॅटिकन सिटीच्या ४४ हेक्टर
क्षेत्रफळापैकी २३ हेक्टर जमिनीवर उभी आहे व्हॅटिकन टेकडी. टेकडी कसली, थोडा
उंचवटाच म्हणायचा तो, कारण त्याची कमाल उंची ६० मीटर, जेमतेम २०० फूट. मुंबईत ज्या
टोलेजंग इमारती उभ्या आहेत त्यातली पॅलेस रॉयल ही २०१५ साली बांधून पूर्ण झालेली
इमारत याहून कितीतरी उंच. तिची उंचीच २९५ मीटर, आणि तिला मजले आहेत तब्बल पाऊणशे.
म्हणजे पाच व्हॅटिकन टेकड्या एकावर एक ठेवल्या तर जेवढी उंची होईल तितकी ही उंची..
व्हॅटिकनमध्ये प्रवेश करताना विशिष्ठ वेष-बंधनं
पाळावीच लागतात. बॅसिलिकात जाणाऱ्या कुणालाही डोक्यावर टोपी घालून जाता येत नाही,
स्कर्ट वा अर्धी चड्डी गुडघ्यावर असून चालत नाही, पावित्र्य भ्रष्ट करेल असे
बाह्या नसलेले टीशर्ट्स घालता येत नाहीत, इतकंच काय डोळ्यात भरतील इतके
दागदागिनेही घालता येत नाहीत. बॅसिलिकाच्या अंतर्गत भागात मोबाईल फोन चालत नाही,
धूम्रपानाचा तर प्रश्नच नाही. वाईन मात्र भरपूर प्यायली जाते. एका माहितीनुसार व्हॅटिकनचा
नागरिक वर्षाला सरासरी ५४.२६ लिटर वाईन पितो. जगातल्या कुठल्याही देशातील दर डोई
वाईन कन्झम्प्शन पेक्षा हे प्रमाण जास्त भरते. व्हॅटिकनमध्ये अवघं एक उपाहारगृह
आहे, पण तिथे खाद्यपदार्थ मिळतात ते रोमन पद्धतीचे, इटालियन खाद्य संस्कृतीत
मोडणारे..
व्हॅटिकनमध्ये राजेशाही आहे, पण ती पोपची.
पोपची निवड निवडणुकीनं होते. वर म्हटल्याप्रमाणे १९२९ मध्ये इटलीशी जो लॅटर्न करार
झाला, त्या करारानुसार व्हॅटिकन सिटीच्या सार्वभौमत्वाला मान्यता मिळाली आणि सर्व
घटनात्मक सत्ता पोपच्या हाती गेली. मंत्रिमंडळ सदस्यांची नियुक्ती करण्याचे अधिकार
पोपकडे असतात, तर प्रशासकीय सत्ता गव्हर्नरकडे असते. पण गव्हर्नर आणि मंत्रिमंडळ
या दोघांच्याही नाड्या पोपच्याच हातात असतात..
व्हॅटिकनची अर्थव्यवस्था जास्त अवलंबून
आहे ती पर्यटकांवर. ते जितके स्टॅम्पस घेतील, जितकी नाणी खरेदी करतील, जितकी पदकं,
जितकी स्मृतीचिन्हं खरेदी करतील तितकी व्हॅटिकनची अर्थव्यवस्था मजबूत होते.
व्हॅटिकनमध्ये खूप संग्रहालयं आहेत, प्रकाशनगृहं आहेत, तिथे येणारे पर्यटक हे
देखील उत्पन्नाचं मोठं माध्यम आहे. युरो हे व्हॅटिकनचं चलन, व्हॅटिकन स्वतः नोटा
छापतं, नाणी पाडतं. व्हॅटिकनमध्ये असलेल्या एटीएम मशीनवर लॅटिन भाषेत सूचना वाचावयास मिळतात, असं लॅटिन भाषेत
सूचना असणारं हे जगाच्या पाठीवरचं एकमेव एटीएम मशीन. चारशे दशलक्ष डॉलर्स हे वार्षिक
महसुली उत्पन्न, पण खर्च त्याहून थोडा अधिकच..
स्त्रियांना पूर्वी मतदानाचाही अधिकार
नव्हता, बँकेत खातं उघडता येत नव्हतं. दुसऱ्या पोपच्या कार्यकाळात स्त्रियांना
सन्मान मिळायला लागला, इन्ग्रिड स्टॅम्पा नावाची एक पोपची खाजगी सल्लागारही होती.
मे २०१९ मध्ये प्रथमच एकाच वेळेस तीन महिलांची नियुक्ती व्हॅटिकनच्या सेवेत झाली.
रोमॅनो हे व्हॅटिकनमधून प्रसिद्ध होणारं एकमेव वृत्तपत्र. या वृत्तपत्रानं अलीकडेच
महिला वाचकांची संख्या लक्षात घेऊन महिला पुरवणी काढायला सुरुवात केली. पोप
फ्रान्सिस यांचा महिलांकडे पाहण्याचा बदलता दृष्टीकोन त्याला कारणीभूत आहे असंही
म्हटलं जातं.
****
व्हॅटिकन सिटी ही संपूर्णपणे शहरी. त्यात
ग्रामीणतेचा अंशही नाही. त्यामुळे इथे शेती नावाचा प्रकारच नाही. धान्य पिकवणं,
भाजीपाला-फळफळावळ पिकवणं ही भानगडच नाही. हे सारं येतं ते इटलीतून. व्हॅटिकनची
स्वतःची टपालव्यवस्था आहे, नभोवाणी आहे, अवघ्या आठशे सव्वा-आठशे लोकसंख्येच्या या
गाववजा देशासाठी दूरध्वनी यंत्रणा आहे. सौरउर्जा हेच वीजनिर्मितीचं मोठं माध्यम,
ती कमी पडली तर इटलीकडून वीज उपलब्ध होतेच.
व्हॅटिकन सिटीच्या वेशीवरून नुसती फेरी
मारायची असं ठरवलं, तरी फारसा वेळ लागत नाही, कारण या वेशीचा परीघ आहे अवघा ३.२
किलोमीटरचा. सेंट पीटर स्क्वेअर वगळला तर व्हॅटिकन सिटीच्या चारही बाजूंनी
मध्ययुगीन आणि प्रबोधनकालीन उंच तटबंदी आजही आहे. शहराला एकूण तीन प्रवेशद्वारं
आहेत. त्यातली दोनच पर्यटकांसाठी खुली असतात. इटालियन ही अधिकृत भाषा, परंतु
व्हॅटिकन सिटीच्या संकेतस्थळावर भाषा दिसतात त्या इंग्रजी, फ्रेंच, जर्मन,
स्पॅनिश. साक्षरता शंभर टक्के.
व्हॅटिकन सिटीचं नागरिकत्व मिळतं ते “ होली
सी ”च्या सेवेत असलेल्यांनाच. नोकरीचा हा करार संपला की नागरिकत्वही संपलं. नोकरी
करणाऱ्या व्यक्तीच्या पती वा पत्नीला, मुलाबाळांना वा पालकांना ते मिळू शकतं, पण
ते त्या व्यक्तीच्या बरोबर व्हॅटिकन सिटीत राहत असतील तरच आणि तिथून ते बाहेर पडले
की ते नागरिकत्व संपतं. स्त्रियांबरोबरच पुरुषांनाही सरसकट मतदानाचा अधिकार असत
नाही. याचं एक कारण बहुधा व्हॅटिकनमध्ये निवडणुका होत नाहीत हेच असावं.
स्त्रियांना धर्मप्रमुख बनता यावं यासाठीची तरतूद कायद्यात आहे, परंतु आजवर अशी
नियुक्ती झाल्याचं उदाहरण नाही. घटस्फोटाला परवानगी नसणारे जगाच्या पाठीवर दोनच
देश, एक व्हॅटिकन आणि दुसरा फिलिपिन्स..
व्हॅटिकन सिटीला सार्वजनिक वाहतूक सेवा
असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, कारण ते आहेच मुळात १.०५ किलोमीटर लांबीचं, आणि
०.८५ किलोमीटर रूंदीचं. इतक्या छोट्या राष्ट्रात वाहनं फिरणार तरी किती आणि कुठे?
या शहर कम राष्ट्राला विमानतळ नाही, एक हेलीपोर्ट मात्र आहे. इथल्या मंडळींना
आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी वापर करावा लागतो तो रोमच्या विमानतळाचा. नाही म्हणायला
एक स्टॅन्डर्ड गेजची रेल्वे आहे. ती रोममधल्या सेंट पीटर स्टेशनला जोडण्यात आली
आहे. तिथे जाण्यासाठी व्हॅटिकन सिटीच्या प्रवाशाला प्रवास करावा लागतो तो ३०० मीटर
अंतराचा. त्यामुळे जगातली सर्वाधिक कमी अंतराची रेल सेवा म्हणून ती ओळखली जाते.
नाही म्हणायला व्हॅटिकनमध्ये मेट्रो आहे, ओट्टाव्हियानो हे मेट्रोचं एकमेव स्टेशन.
पोप जॉन तेविसावे हे या रेलसेवेचा लाभ घेणारे पहिले पोप, पण पोप जॉन पॉल दुसरे
यांनी रेल्वेचा वापर केल्याचे ऐकिवात नाही..
*****
१५ व्या शतकामध्ये व्हॅटिकन पॅलेस नावाचं
संकुल उभारण्यास प्रारंभ झाला. या संकुलातल्या खोल्यांची संख्याच हजाराच्यावर आहे.
त्यातल्या बहुतांश खोल्या ग्रंथालयं, वस्तुसंग्रहालयं यांनी व्यापल्या आहेत.
नामवंत कलाकारांच्या निवडक कलाकृती तिथे जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. त्यात
मायकेल एंजेलोचं लास्ट स्टेटमेंट आहे, साठ हजाराहून अधिक हस्तलिखितं आहेत, एक
लाखांवर उत्कीर्णनं आहेत, नकाशे आहेत, नऊ लाखांहून अधिक दुर्मिळ ग्रंथ आहेत..
व्हॅटिकनचं सरासरी आयुर्मान आहे पुरुषांचं
७४ वर्ष तर स्त्रियांचं ८१ वर्ष. व्हॅटिकनमध्ये अनेक चित्रपटांचं चित्रीकरण होत
असतं. ‘ एंजल अँड डेमन्स ’, ‘ गॉडफादर थ्री ’ हे त्यातले काही. व्हॅटिकनचं
गुन्हेगारीचं प्रमाण जरा जास्त आहे. किरकोळ चोऱ्यांचं प्रमाण लोकसंख्येच्या ८७
टक्के, पण दखलपात्र गुन्ह्यांचं प्रमाण १३३ टक्के आहे. ते इतकं मोठं असण्याचं
एकमेव कारण म्हणजे लक्षावधींच्या संख्येत येणाऱ्या पर्यटकांना लुबाडण्याची ती एकमेव
संधी. गुन्हा करायचा, चोरी करायची आणि पकडलं जाण्याची शक्यता निर्माण झाली की सीमा
ओलांडून इटलीत निघून जायचं, ही साधी सोपी पद्धती. पण गुन्हेगार हीच पद्धती इटलीतही
अवलंबतात. गुन्हा इटलीत करायचा, पाकीट मारायचं, पैसे लुबाडायचे, आतली कागदपत्रं
फाडून फेकून द्यायची आणि नामानिराळे राहायचं. एवढ्या मोठ्या संख्येतले गुन्हे
चालवण्याची यंत्रणा व्हॅटिकनच्या न्यायालयात नाही, त्यामुळे थकीत खटल्यांचं प्रमाण
खूप. पण त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे व्हॅटिकनमध्ये तुरुंगच नाही. त्यामुळे
शिक्षा झालीच तर गुन्हेगाराला पाठवावं लागतं ते इटलीतल्या तुरुंगात. आहे की नाही
गंमत? गुन्हा एका देशात करायचा आणि शिक्षा मात्र दुसऱ्याच देशात भोगायची..
तर असं हे व्हॅटिकन ! व्हॅटिकन सिटीत
कायमचं वास्तव्य करणारे भारतीय कुणीही नाहीत. व्हॅटिकनमध्ये जायचं तर व्हाया इटलीच
जावं लागतं, तिथे मात्र भारतीय मोठ्या संख्येत आहेत. व्हॅटिकनला जाण्यासाठी सहा
महिन्यांची वैधता असणारा पासपोर्ट हवा, शेंजेन व्हिसा हवा. मुख्य म्हणजे व्हिसा
काढण्यासाठी स्वतः उपस्थित राहायला हवं.
****
अधिकृत नाव व्हॅटिकन सिटी स्टेट -
व्हॅटिकन सिटी : स्वातंत्र्यदिन ११
फेब्रुवारी १९२९
क्षेत्रफळ : ०.४९ चौरस किलोमीटर,
लोकसंख्या : ८२५
चलन : युरो,
राजभाषा : इटालियन
आंतरराष्ट्रीय दूरभाष संपर्क : संकेतांक
+३७९
व्हिसा : प्रवेश
इटली मधूनच होत असल्याने शेंझेन व्हिसा नियम
No comments:
Post a Comment